अविनाष उषा वसंत
कबीर यात्रा म्हणजे भारतात लोकसंगीताच्या माध्यमातून कबीर गाणाऱ्या आणि ऐकणाऱ्या
लोकांचा मेळा. कबीर यात्रेत ज्या गायक-वादकांना भेटलो त्यांची कला, त्यांची गायकी कुठल्या साच्यात बांधता येण्यासारखी नाही..तिला घराणेशाहीची मोठी परंपरा नाही..त्या गायकीला प्रमाण गायकीची मोजपट्टी लावण्यात अर्थ नाही…ती अर्थ पोहोचवते…ती तुमची स्वतःशी गाठ घालून देते.
६ ऑक्टोबर २०१९ ची रात्र, वातावरणात हलका पाऊस… रामगढ नावाच्या राजस्थानातील एका छोट्याशा शहरात ‘शबनम विरमानी’ कबीरांचे भजन गात होते. साधारण दोनशेएक प्रेक्षकांच्या समोर कबीराचे राम कोणकोणते आहेत याचे वर्णन करताना शबनम गातात,
एक राम दशरथ का बेटा
एक घर घर मै बैठा एक राम का सकल पसारा एक त्रिभुवनसे न्यारा
कबीरांच्या मते हे चार राम आहेत. पहिला आपल्याला माहीत असलेला, बोलबाला असणारा दशरथाचा मुलगा… दुसरा प्राणीजातीच्या शरीरात असणारा… तिसरा म्हणजे ह्या विश्वातील चेतना… तर चौथा हा सर्वात वेगळा ज्याचे शाब्दिक वर्णन करता येत नाही असा, हद- अनहदच्या पलिकडे असणारा… रामावरून चर्चेत असणारा प्रदेश हा कबीराचाही प्रदेश. पण या चार रामांत सांगितलेले कबीराचे “निरीश्वरवादी’ व्दैती सांख्य तत्त्वज्ञानाच्या जवळ जाणारे राम मात्र हा प्रदेश विसरायला लागलायं. राजस्थानातील ज्या गावात ‘शबनम विरमानी’ कबीरांचे भजन गात होते त्याचे निमित्त होते कबीर यात्रेचे… राजस्थान कबीर यात्रा ही “गूढवादी’ लोकसंगीताला वाहिलेली देशातील सर्वात लांब यात्रा समजली जाते. २०१९ हे या यात्रेचेे पाचवे पर्व होते. म्हणजे कोरोनापूर्व काळी. यात्रेचा प्रवास जयपूर ते जैसलमेर असा साधारण साडेपाचशे किलोमीटरचा होता. हा मार्ग निश्चित नसतो, तो दरवेळी बदलत राहतो. ही यात्रा म्हणजे लोकसंगीतातून निर्गुण, सुफी आणि भक्ती अशा विविध अध्यात्मिक संप्रदायातील संतांची वचने गाऊन आनंद साजरा करायचा एक उत्सव असतो. यात मुख्यत्वे करून कबीरांची निर्गुण भजने असतात पण त्याच बरोबर मीराबाई, बुल्लेशा, बाबा फरीद, नानकदास, गुरू नानक, रहीदास, अमीर खुसरो अशा संतांनी केलेल्या कविता,ज्या जात-धर्माची ओळख सोडून आलेल्या आहेत. त्यांचे मौखिक रूपाने इथल्या समाजाने शेकडो वर्षे जतन केले आहे, असे लोकसंगीत ह्या यात्रेत गायले जाते. ह्या प्रवासात सहा ठिकाणी ‘जागरण / सत्संग’ केले जाते. कसलीही विभूतीपूजा न करता जवळपास पन्नासहून अधिक देशातल्या विविध प्रदेशातून आलेले लोककलाकारांनी यात सहभाग घेतला होता.
राजस्थान कबीर यात्रेत सहभागी होणारे कलाकारदेखील प्रेक्षकांसोबतच हा प्रवास करतात. जागराणाचे आठ तास, सकाळच्या सत्संगाचे दोन तास आणि सबंध प्रवासातही सर्व जण कबीरांचे निर्गुण भजन नाहीतर बाबा बुल्लेशांचे कलाम गातच मार्गक्रमण करत असतात. त्यामुळे दिवासाचा निम्म्याहून अधिक वेळ तर आपण लोकसंगीताच्या सानिध्यातच असतो. यात लोकसंगीताची मनाला मोहित करणारी जादू असतेच पण भारतीय अध्यात्मिक परंपरेतील ‘कोणताच वैरभाव नसणाऱ्या’ विविध संताच्या विचारांचा जागर ही असतो. हा जागर करताना कोणताही जात-धर्म भेद आड येत नाही. ‘एक बुंद एक मल मूतर एक चाम एक गूदा एक जोती से सब उतपना कौन बामन कौन शूद’ हे कबीरांचे वचन आठवल्याशिवाय राहत नाही. राजस्थान कबीर यात्रेचा प्रवास बघितला तर कळून येते, जसा तो भूमीवरून गंगा आणि सिंधूच्या मैदानाला जोडत आहे. तसाच तो गंगा आणि सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेल्या संस्कृतींनाही जोडायचे काम करतोय. राजस्थानचा प्रदेश हा दोन्ही नद्यांच्या खोऱ्यात वसलेल्या व्यापाऱ्यांच्या प्रवासाचा भागाने व्यापलेला, बराचसा वाळवंटी प्रदेशात. प्रवास करताना आणि मुक्कामाच्या ठिकाणी लोकसंगीताशिवाय मनोरंजनाचे दुसरे साधन नाही. शेती फार नसल्यामुळे व्यापारी समुदायाची ‘भरभराट’ ही या प्रदेशातील गावागावात दिसून येते. आज दोन्ही संस्कृतींना देशांच्या सीमांनी तोडले असले तरी संगीताने जोडलेले आहे, हे राजस्थान कबीर यात्रेत दिसून आले. वाळवंटातील खेड्यात राहणारा मीर बासू बरकत खान पुगल हा एक लोकगायक… पुगल पासून पाकिस्तानची सीमा काही किलोमीटरवर आहे. संगीताचं शिक्षण नाही. सासऱ्याने मुलीसोबत संगीतही दिलं. मुळात ‘सराईका’ भाषेतील कलाम गाणारा हा गायक. हीच सराईका भाषा पाकिस्तानची मूळ भाषा असल्याचे बोलले जाते. बाबा बुल्लेशा, बाबा फरिद यांनीही या भाषेत लिहून ठेवलयं. तोच ‘मीर’ “सखी रे मै तो प्रेम दिवाणी मेरा दर्द न जाणे कोई’ हे ‘मीराबाई’ च भजन गातो, “खुसरो’च “छाप तिलक’ गातो. जैसलमेरचे ‘महेशाराम’ राजस्थानी लोकसंगीतातील “वारी जाऊं रे बलहारी जाऊं रे’ हे भजन गाताना त्यांच्या गायकीच्या संचात मुस्लिमधर्मीयच जास्त होते. राजस्थानच्या वाळवंटात लोकसंगीतामधून बऱ्याच प्रेमकहाण्या फुललेल्या आहेत. ह्या प्रेमकहाण्या ही जात-धर्माच्या बंधनांना तोडून टाकलेल्या दिसतात. सारंगीच्या आर्त स्वरातून ‘प्रेमकहाण्यांची’ गायकी ऐकणे केवळ अविस्मरणीय आनंद देवून जाते. ‘दापू खान’ हे असेच लोकसंगीतातील दादा नाव. ऐंशी वर्षाच्या वर झुकलेले पण त्यांनी गायलेल्या ‘मुमल’ या लोकगीतात सुध्दा अशाच प्रेमकहाणीचे वर्णन येते. ‘प्यारी प्यारी मुमल ने हाले तो ले चाली धोरा रे वाले देश’ ‘मुरालाल मारवाडा’ हे सुध्दा एक भन्नाट लोककलावंत. ‘हेल्लारो’ या स्त्री व जात प्रश्नावर बोट ठेवलेल्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गुजराती चित्रपटात त्यांची गाणी आहेत. कबीर यात्रेवेळी त्यांचा एक
वर्षाचा मुलगा प्रेक्षकांत होता. त्यांच्या अवीट गोड आवाजात “एकला मत छोडजो बंजारा रै’ हे कबीर भजन ऐकताना तो मुलगा आनंदाने डोलायला लागला होता. अनेक वर्षांच्या ताल आणि तानाने सुलाखून निघालेले लोकसंगीत हे इथल्या मातीची खरी ओळख सांगतात, याचा प्रत्यय अशा प्रसंगातून येतो. कबीर यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ‘ताना बाना’. याचा अर्थ विणकामाशी निगडीत आहे. विणकामात आडव्या उभ्या धाग्यांना ताना बाना म्हणतात. कबीर कपड्याच्या विणकामाला समाजाचे प्रतिक म्हणून बघतात. समाजातील विविध रंगांच्या ताना बाना ह्या कपड्यात एकरूप होतात, तो एकसंध समाज आहे. ताना बाना हे राजस्थान पोलिसांनी कबीर यात्रेच्या आयोजनात केलेले सहकार्य आहे. कबीर यात्रांच्या जागेचे नियोजनही राजस्थान पोलिसांमार्फत केले जाते. अगदी सगळ्या यात्रेकरूंच्या स्वागताला पोलिस हारफुले घेवून उपस्थित असतात. यात्रेकरूंसोबत नाचतात ही. कबीर यात्रेच्या जागांची निवड ही मुख्यत्वे ‘सामाजिक अशांतता’ असणाऱ्या ठिकाणांची पोलिसांमार्फतच केली जाते. कबीर यात्रेच्या निमित्ताने स्थानिक जनतेमध्ये सहकार्य, बंधूता, सलोखा, करूणा, एकोपा वाढीस लागावा हा त्यामागचा खरा उद्देश. २०१६ पासून अमनदीप कपूर ह्या पोलिस अधिकाऱ्याच्या कल्पनेतून आलेल्या ह्या गोष्टीचे उत्तम परिणाम झाल्याचा आत्मविश्वास येथील पोलिस अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. निर्गुणी भजनातील, लोकसंगीतातील मौखिक रूपाने जतन केलेला कबीर आज आपल्यापर्यंत पोहचलाय ही नक्कीच ‘पद्मश्री प्रल्हाद सिंग तिपानिया’ यांची देण आहे. वीस वर्षापूर्वीच ते माळव्याचे रॉकस्टार आहेत. देश विदेशात जे कबीर फेस्टिवल आयोजित केले जातात ते त्यांच्या शिवाय पूर्ण होत नाहीत. ‘जाती ना पुछो साधू की, पुछ लिजीए ग्यान’ ही कबीरांची ओळ तिपानिया यांना त्यांच्या यांच्या गावातच अनुभवायला मिळाली. त्यांना जातीय भेदभाव कसा सहन करावा लागला होता हे ‘एक अजब शहर’ ह्या डॉक्युमेंटरीमध्ये दिसून आलेले. “एक अजब शहर’ हा कबीरांच्या विचारांना वाहिलेला एक प्रकल्प आहे. यात शबनम विरमानी यांनी मौखिक रूपाने पसरलेल्या कबीराचे डॉक्युमेंट केले आहे. पूर्वाश्रमीचे शूद्र व अतिशूद्र आजही कबीराच्या निर्गुण भजनांची मागणी करतात. कारण ज्या कबीराने ‘मुर्तीचे’ रूप नाकारले, ज्या ‘रूपाच्या’ दर्शनापासूनही त्यांना हजारो वर्षे लांब ठेवले होते त्यातून त्यांची सुटका कबीरांनी केलेली आहे. अशा समुदायांनी कबीर पंथ सुरू केला, ह्या त्याकाळातील जात मुक्तीचा मार्गच होता. तिपानिया यांच्या ल्युंडखेडी गावातील कबीराच्या केंद्रात ( मंदिर/मस्जिद?) ना कोणतीही मूर्ती आहे ना चित्र. आज जगभरात होणाऱ्या कोणत्याही कबीर यात्रेमध्ये कबीरांची कोणतीच विभूतीपूजा आढळून येत नाही, त्यात असते केवळ लोकसंगीत, संकिर्तन, सत्संग, जागरण. महाराष्ट्रात संतांची परंपरा जुनी आहे पण कर्मकांडांना विरोध दर्शवलेल्या संतांचेही विभूतीपूजा आज चाललेली दिसते. त्याला कबीर यात्रांतून काही बोध मिळेल का? असा प्रश्न पडतो. ‘कबीर खडा बाजार मै, मांगे सबती खैर ना काई से दोस्ती, न काई से बैर’ सद्भावाचा संदेश देणाऱ्या कबीराच्या प्रदेशात आज बघितले तर ‘सामाजिक अशांतता’ दिसून येते. मानवी तुच्छता, जात-धर्माधारीत मानवी ध्रुवीकरण ह्यांनी तो प्रदेश ग्रासलेला आहे. याच
ध्रुवीकरणातून ‘सामाजिक हत्यांचे’ सत्र दिसून येते. आज आपण कबीरांचे संदेश विसरून गेलोय का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ‘कबीर यात्रे’ सारखे उपक्रम तरी यातून मार्ग काढू शकतात का? हा आशावादी प्रश्न आपल्याला पडतो. सव्वीस वर्षे माळव्याची कबीर यात्रा चालूय, मुंबई कबीर फेस्टिवल सारखे उपक्रम देशभरात आयोजित केले जातात. पण कबीराने आयुष्य घालवलेल्या प्रदेशात तस काही ऐकायला येत नाही आणि कबीराने तर सर्वांनाच संदेश दिला आहे, ज्यात तुम्हाला तुमची ओळख सोडायला ते सांगतात.
कबीरा खडा बाजार मै लिए लुकाठी हाथ जो घर फुकें आपनौ, चल हमारे साथ